पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश; पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्रातील विकासकामांचा आढावा
Washim : श्रीक्षेत्र पोहरोदवी (Pohradevi) येथील श्री संत सेवालाल महाराज (Sant Sevalal Maharaj) तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी (Umari) व पोहरादेवी (Pohradevi) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत करण्यात येणारी सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी तातडीने सुरू करण्याचे नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
पोहरादेवी (Pohradevi) येथील नंगारा वास्तू संग्रहालय (Nangara Museum) येथे श्री संत सेवालाल महाराज (Sant Sevalal Maharaj) तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पोहरादेवी-उमरी विकास आराखड्याशी संबंधित कामाबाबत 23 फेब्रुवारी रोजी आयोजित आढावा सभेत पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) बोलत होते. सभेला राज्याचे माजी पोलिस महासंचालक तथा गुरुव्दारा बोर्ड नांदेडचे प्रशासक डॉ. पी. एस. पसरीचा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, प्रसिध्द वास्तू विशारद अमरदिप बहल, गुरुव्दारा बोर्ड नांदेडचे संचालक जसबीरसिंग, महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री राठोड (Sanjay Rathod) म्हणाले की, उमरी आणि पोहरादेवी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे करण्यासाठी संबंधित जागा मालकांकडून संमतीपत्रे घेण्यात यावी. शासकीय जमिनीवर ज्या ठिकाणी महावितरण, सहकार व ग्रामपंचायत विभागाची कार्यालये व इमारती आहेत. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची कारवाई तातडीने करण्यात यावी. विकास आराखड्यासाठी ज्या शासकीय जमीनीचे अधिग्रहण करावयाचे आहे. त्या जागांची मोजणी करून विकासकामे करण्याच्या दृष्टीने त्वरित नियोजन करावे. विकास आराखड्यातील सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण करावी. या कामांमध्ये कोणतीही उणीव राहणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेण्याचे सांगितले.
आढावा सभेत हिंगे यांनी पोहरादेवी (Pohradevi) व उमरी (Umari) येथे विकास परिसरातील उपलब्ध शासकीय जमिनीबाबतची तसेच अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेलया खाजगी जमिनीची माहिती दिली. धोंडगे यांनी पोहरादेवी आणि उमरी विकास आराखड्यातंर्गत कामांची संकल्पना व आराखडे तसेच नंगारा वास्तु संग्रहालय (Nangara Museum) परिसरातील प्रगतीपथावर कामे तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी श्री. संत सेवालाल महाराज (Sant Sevalal Maharaj) पोहरादेवी (Pohradevi) तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडयाचे चित्रफितीव्दारे सादरीकरण उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, कारंजाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी धीरज मांजरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता राऊत, उपविभागीय अभियंता नीलेश राठोड, मानोरा उपविभागीय अधिकारी खोडे, तहसीलदार ज्ञानेश्वर घ्यार, साहाय्यक उपवनसंरक्षक विपूल राठोड, तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक आडे यांची उपस्थिती होती.
विकास आराखड्यासाठी गुरुव्दारा बोर्डचे सहकार्य : डॉ. पसरीचा
पोहरादेवी (Pohradevi) आणि उमरी (Umari) तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी गुरुव्दारा बोर्ड (Gurudwara Board) सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या कामांमुळे दोन्ही गावांच्या विकासाला चालना मिळेल. ग्रामस्थांना त्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटन क्षेत्र (Tourism) म्हणून पोहरादेवीचा विकास झाला पाहिजे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक पोहरादेवी (Pohradevi) येथे येतील. विकास अराखड्यातंर्गत कामे पूर्ण झाल्यावर त्या वास्तूंचे व्यवस्थापन आणि स्वच्छता कायम ठेवणे हे महत्त्वाचे काम आहे. लेझर शो (Lazer Show), बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित केल्यास उत्पन्नाचे साधन त्यामधून उपलब्ध होणार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक पोहरादेवीत येतील. 200 हेक्टरवर वनोद्यान तयार होऊन ते विकसित झाल्यावर मोठ्या संख्येने दूरवरून पर्यटकदेखील पोहरादेवीला येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.