जगभरात आज म्हणजेच ३१ मे रोजी जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा करण्यात येतो. आजचा दिवस तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जाणून घेण्याबाबत आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी साजरा करण्यात येतो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसतात. घर असो कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरुणाई देखील मोठ्या संख्येने धुम्रपानाच्या व्यसनाला बळी पडत असल्याचे समोर आले आहे. तंबाखू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो. सोबतच दात कमजोर होतात. तंबाखूमुळे कर्करोग होतो, हे सगळ्यांना माहित आहे. परंतु तरी देखील बहुतांश लोक तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात. अनेक अभ्यासामधून ही बाब समोर आली आहे की, धुम्रपान करणारे अनेक लोक म्हणतात की हे व्यसन सोडणं त्यांच्यासाठी सोपं नाही. अनेक प्रयत्नातरही त्यांना व्यसन सोडण्यात अपयश येतं. यामुळं आज जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा उपायोग करून तुम्ही धुम्रपानाच्या व्यसनापासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकता.
- निर्धार पक्का हवा, काय कराल?
– धुम्रपानाच्या व्यसनापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी सर्वात आधी तर तुमचा निर्धार पक्का हवा. काहीही झालं तरी तुम्ही सिगारेटला हात लावणार नाही.
-जेव्हा धुम्रपानाचा विचार मनात येईल, तेव्हा हा विचार करा की यामुळं तुमचं कुटुंब देखील प्रभावित होऊ शकतं.
– याचा विचार करा की तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये धुम्रपान करता. तणाव असेल तर धुम्रपानाऐवजी दुसऱ्या कामांमध्ये किंवा आवडीच्या बाबींमध्ये आपलं मन गुंतवा. धुम्रपानापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा
– सिगारेट ओढल्यानंतर ऐश ट्रे स्वच्छ करू नका. भरलेला ऐश ट्रेल पाहून तुमच्या लक्ष्यात येईल की तुम्ही किती धुम्रपान करत आहात.
- काय आहेत तंबाखू सोडण्यासाठी उपाय?
– तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन सोडण्याचा मनाशी दृढ निश्चय करा.
– अचानक तंबाखू सोडायचा विचार करू नका, टप्प्याटप्प्याने तंबाखू खाणे कमी करा.
– तंबाखूऐवजी ज्येष्ठमधाचे तुकडे खिशात ठेवा. तंबाखू खायची इच्छा होईल तेव्हा ज्येष्ठमधाची काडी तोंडात टाका. ज्येष्ठमध मुखशुद्धीसाठी देखील चांगले आहे.
– सिगारेट, पान आणि जर्दा लवकर मिळतील, अशा ठिकाणी ठेवू नका.
– धूम्रपान करण्यासाठी प्रेरीत करणारे कारणे ओळखा. त्या ऐवजी पान खा, चॉकलेट खा.
– तुमचे जे जे मित्र, सहकारी सिगारेटी, पान, जर्दा खात असतील. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा.
– जेव्हा तल्लफ येईल तेव्हा उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते.
– तंबाखू किंवा तंबाखूजन्य सेवनाची तल्लफ येईल तेव्हा तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा. तुमच्यावर तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी विचार करा.
– तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळे मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मिश्रण खा.
– बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणे सुकर होते.
- सिगारेट सोडण्याचे घरगुती उपाय
– दालचीनी कुटून घ्या. त्यामध्ये मध घाला. सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास या मिश्रणाचं सेवन करा.
– ओवा-सोफमध्ये थोडं काळं मीठ टाकून कुटून घ्या. यामध्ये लिंबाचा रस घालून रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हे मिश्रण भाजून घ्या आणि एका डब्यात भरून ठेवा. जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा या मिश्रणाचं थोडं सेवन करा.
– आलं आणि आवळा कुटून वाळण्यासाठी ठेवा. यामध्ये लिंबू आणि मीठ टाका. जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा या मिश्रणाचं सेवन करा.
३१ मे हा दिवस फक्त लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे की, आपण अजूनही तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त झालेलो नाही. आपली लढाई अजून बाकी आहे. मंडळी तुम्ही सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून या लढाईत सहभाग दर्शवला पाहिजे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा, अनोळखी माणसांना तुम्ही समजावू शकत नसलात तरी ओळखीच्या माणसांना तुम्ही नक्कीच समजावू शकता. चला तर आजपासून आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेऊया आणि तंबाखूला कायमचं हद्दपार करुया.